पुणे : राज्यातील तापमानात चढ-उतार होत असून त्यामुळे पुणेकरांना आज थंडीचा कडाका जाणवला आहे. पुण्यात आज हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. 12.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवस शहराच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकर थंडीने चांगलेच गारठले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिम महाराष्ट्रातही तो जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या तापमानात विशेषत: किमान तापमानात कमालीचा बदल होत आहे.
शहराच्या इतर भागातही किमान तापमानात लक्षणीय घट झाली. एनडीए, बारामती, हवेलीसह तीन भागात तापमान 11 अंशांपर्यंत घसरले. शिवाजीनगर व्यतिरिक्त इतर चार स्थानकांवरही किमान तापमान 12 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन ते तीन दिवस शहरात तापमानात ही घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. तापमानात झालेली ही घट मुख्यत्वे उत्तरेकडील थंड वारे शहरात दाखल झाल्यामुळे आहे.