लोणी काळभोर : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज बुधवारी (ता.20) सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरु झाली आहे. वातावरण थंड असल्याने चाकरमान्यांची सकाळच्या प्रहरात मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली आहे. मात्र मतदान केंद्रावर लोणी काळभोर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर , कुंजीरवाडी , तरडे व आळंदी म्हातोबाची या 6 गावांच्या ठिकाणी मतदानाचे 62 केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी बुथवर पाणी व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना नावे शोधून देण्यासाठी मतदान केंद्रात बीएलओ बसलेले आहे. तर मतदान केंद्रापासून 200 मीटर अंतरावर राजकीय पक्षाचे नेते व त्यांचे पदाधिकारी मंडपात बसलेले आहेत. तसेच येणाऱ्या नागरिकांची नावे शोधून देत आहेत.
लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळा, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय व कदमवाकवस्ती जिल्हा परिषद शाळा, सेंट मदर तेरेसा हायस्कूल व एंजल हायस्कूल या ठिकाणी सकाळी सात ते दहा वाजण्याच्या सुमरास मतदारांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे राजकीय नेते, नोकरदार व चाकरमान्यांनी सकाळच्या थंडीत मतदान करण्यास अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्राच्या आतमध्ये केवळ मतदारांना प्रवेश देण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेले आहेत. सर्व मतदान केंद्राच्या आत व बाहेर लोणी काळभोर पोलीस, 20 कमांडो व 50 हून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. हा बंदोबस्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आला आहे.