सध्या राजधानी दिल्लीतच नाहीतर देशातील अनेक राज्यांत वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हे वाढते प्रदूषण तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, काही गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे काय काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
हवेतील वायू प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे, त्यामुळे त्यात नायट्रोजन डायऑक्साइड, नायट्रिक ऑक्साईड आणि सल्फरचे प्रमाण जास्त असल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. विषारी हवेच्या संपर्कात आल्याने लालसरपणा, जळजळ, खाज सुटणे, पाणी येणे, अंधुक दृष्टी आणि डोळे आणि पापण्यांचा संसर्ग होऊ शकतो. तसेच वायू प्रदूषणामुळे काचबिंदू आणि मोतीबिंदूचा धोकाही वाढतो. अशी कोणतीही लक्षणे डोळ्यांत दिसल्यास लगेच डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
याशिवाय, प्रदूषित हवेचा संपर्क टाळा. डोळ्यांचे व्यायाम करा. डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी हात साबणाने चांगले धुवा, अशाप्रकारे काळजी नक्की घ्या. धुक्यामुळे डोळ्यांना लालसरपणा आणि खाज सुटू शकते. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये काही समस्या येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय डोळ्याचे कोणतेही थेंब लावू नका. कॉन्टॅक्ट लेन्स घालणे टाळा, अशाप्रकारचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.