Maharashtra assembly election 2024 : विधानसभा निवडणुकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर जोरदार तयारी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे.
खडकवासला मतदान केंद्रावर वीज पुरवठा खंडीत
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे विद्यालय मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडीत झाला. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत केल्याने मतदान प्रक्रीया पुन्हा सुरु झाली.
कोल्हापुरात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड
कोल्हापूर उत्तर विधासभा मतदारसंघातील मध्यवर्ती बस स्थानकातील विक्रम हायस्कूल येथील ईव्हीएम तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड
तर दुसरीकडे नाशिकमधील पंचवटी परिसरातील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथवर तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमधील मतदान हे 20 मिनिटे उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदानासाठी गेलेल्यांचा खोळंबा झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीन बंद
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मतदानाच्या सुरुवातीलाच मतदारांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगावात ईव्हीएम मशीन बंद
तसेच जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला 15 ते 20 मिनिटे विलंब झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
मालेगाव बाह्यमध्ये ईव्हीएम मशीन बंद
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 292 या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे.