मुंबई : टपाली मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मत दिल्यानंतर मतपत्रिकेचा फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या शिवडी पोलीस ठाण्यातील अंमलदाराविरोधात सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाझ पठाण असे गुन्हा दाखल झालेल्या अंमलदाराचे नाव असून मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २२३ आणि लोकप्रतिनिधी अधिनियम कलम १२८ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाण्यातील रहिवासी असलेले मनोज कोष्टी (५६) हे निवडणूक अधिकारी असून त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्ह्यानुसार, शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार रियाझ पठाण यांनी १४ नोव्हेंबरला भायखळा येथील १८४-भायखळा विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, जिल्हा सातारा या मतदारसंघासाठी टपाली मतदान केले.
मत नोंदविल्यानंतर पोलीस हवालदार पठाण यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढला. त्यानंतर, त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेत तपासणीअंती पोलीस हवालदार पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी गणेश शिंदे नावाच्या पोलिसानेदेखील असाच प्रताप केला होता. त्याच्याविरोधात गावदेवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.