मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मात्र, दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा मतदानाच्या आदल्या दिवशीच बहुजन विकास आघाडीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच आता डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. थेट बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे डहाणू विधानसभेत भाजपची ताकद वाढली आहे. सुरेश पाडवी यांनी भाजपच्या उमेदावाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.