पुणे : हडपसर – सासवड मार्गावरील कानिफनाथ गड डोंगर माथा ते होळकरवाडीकडे जाणार्या रस्त्यावर सोमवारी (दि. 18) रात्रीच्या वेळी मुक्त संचार करताना काही नागरिकांना बिबट्या आढळून आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कानिफनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या रस्त्याचा वापर करतात. तर गुरुवार, रविवार, अमावस्या, पोर्णिमा, शनिवारी, रविवारी व सुटटीच्या दिवशी गडावर दर्शनासाठी ये -जा करणार्या भाविकांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर पहाटे या परिसरात फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बोपगाव परिसरातील रसवंती, हाॅटेल व्यावसायिक, कामगार, कानिफनाथ गडावरुन पलीकडील भागातील हांडेवाडी, हडपसर तसेच उंड्री पिसोळी भागात व्यवसायानिमित्त राञी अपराञी दररोज ये – जा करत असतात वनविभागाने वेळीच दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. भविष्यात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी व इतर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या भागातुन प्रवास करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.