नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (दि. 18 नोव्हेंबर) अज्ञातांनी हल्ला केला होता. त्यावेळी त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली.
काय म्हणाले अनिल देशमुख?
‘मी भाजपाला इतकं सांगतो की, मला दगड मारा किंवा गोळी मारा अनिल देशमुख मरणार नाही. तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही’. असा इशारा अनिल देशमुख यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजपाला दिला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आला आहे.