पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट खाते उघडून मैत्रिणीचे अश्लिल फोटो अपलोड करुन अश्लिल शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोथरुड परिसरात राहण्यास आहे. आरोपी तरुणीचा मित्र असून तिने त्याच्याबरोबर असलेले प्रेमसंबंध तोडले. प्रेमसंबंध तोडल्याने आरोपी तिच्यावर चिडला होता. याच रागातून त्याने तरुणीच्या नावे समाज माध्यमात बनावट नावाने खाते उघडले. समाज माध्यमातील खात्यावर तरुणी आणि तिच्या आईच्या नावे बदनामीकारक मजकूर प्रसारित केला. तसेच त्याने अश्लील छायााचित्रे प्रसारित केली.
दरम्यान, हा सर्व प्रकार फिर्यादी तरुणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तरुणीला शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे तक्रार दिली तर तुला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम करत आहेत.