पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जर सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतची तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिला आहे.
पोळ म्हणाले की, अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व अन्य आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदींना ही सुट्टी किंवा सवलत लागू राहणार आहे. सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांनी या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने यामध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास पुणे विभाग सहायक कामगार आयुक्त नि. अ. वाळके (मोबाइल क्र. ९९७५९३३४१६), त. श. अत्तार (मोबाइल क्र. ९८९०४२४८१३), डी. डी. पवार (मोबाइल क्र. ७७७५९६३०६५), दुकाने निरीक्षक बी. व्ही. लांडे (मोबाइल क्र. ९९२१९७११६३), राजेंद्र ताठे (मोबाइल क्र. ९४२०७६३१११) या संपर्क क्रमांकावर तक्रार देता येईल, असे शैलेंद्र पोळ यांनी कळविले आहे.