लोणी काळभोर, (पुणे) : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया उद्या बुधवारी (ता. 20) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर व उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 112 केंद्रावर मतदान होणार आहे. तरी सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर आयुक्तालयात येत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 गावांच्या ठिकाणी मतदान होणार आहे. या ठिकाणी मतदानाचे 62 केंद्रे उभारण्यात आले आहेत. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे प्रत्येकी 20, थेऊर 8, कुंजीरवाडी-7, तरडे- 2, आळंदी म्हातोबाची – 5 अशा केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात येत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कोरेगाव मूळ, नायगाव, पेठ, प्रयागधाम, भवरापूर, टिळेकरवाडी व खामगाव टेक या 11 गावांच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या गावांमध्ये 50 मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये. यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने करडी नजर ठेवलेली आहे.
सर्वसामान्य माणसाच्या जीवनात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, तसेच जर कोणी आचारसंहितेचा कोणी भंग केला, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी 112 या नंबर क्रमांकवर कॉल करावा. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे.
-राजेंद्र करणकोट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे)