दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील ऊसतोड मजुराच्या अवघ्या अडीच महिन्याच्या बाळाचा जीव घेणारा बिबट्या वन विभागाकडून जेरबंद करण्यात आला आहे. या नर जातीच्या बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरलं होतं. नागरिकांनी काल (दि. १७) घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रचंड वादावादी केली होती. वन विभागाचे वरिष्ठ कार्यालयापासून रेस्क्यू टीमचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामस्थांनी कुठल्याही परिस्थितीत बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा आग्रह वन अधिकाऱ्यांसमोर धरला होता. मनुष्याचा एक बळी गेल्यानंतर पुढील घटना घडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वनविभागाने उशिरा का होईना पावले उचलण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण परिसर ड्रोनच्या मदतीने पिंजून काढण्यात आला. मात्र, बिबट्या सापडला नाही.
त्यामुळे रात्री पुन्हा परिसरात पिंजरे लावण्यात आले. मात्र, सकाळी निराशाच पदरी पडल्याने वन अधिकारी आणखी चिंताग्रस्त झाले होते. अशातच परिसरातील नागरिकांनी व संघटनांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते.
बाळू भागुजी टेंगले (रा. धायगुडेवाडी बोरीपार्धी ता. दौंड) यांच्या क्षेत्र गट नंबर १३९ मध्ये दि १७ रोजी ऊसतोड चालू असताना ऊसतोड मजुराच्या चिमुकल्याचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाला होता. याच ठिकाणी वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात (दि. १८) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दरम्यान, परिसरातील बिबट-मानव संघर्ष होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी ग्रामस्थांनी घ्यावी व सतर्क राहावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.