पुणे : पुण्यातील माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. याघटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. नेमका हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कार चालक सचिन गायकवाड दुपारी एमएसईबी ऑफिसकडे गेले होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईने उतरले व पाठिमागे गेले, त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत.
माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु चार महिन्यांपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला होता. मात्र गेल्या 6 दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अगदी काही तास बाकी असताना हल्ल्याची घटना घडली आहे. हा हल्ला कशासाठी झाला आहे आणि त्यांच्यावर हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समजू शकली नाही. याप्ररकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.