नवी दिल्ली : ७० वर्षे आणि त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’साठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १० लाखांपेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांनी या कार्डसाठी नोंदणी करत योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि योजनेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत (एबी पीएम-जेएवाय) मोफत आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी पात्र आहे. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. आयुष्मान वय वंदना कार्डसाठी नोंदणी करणाऱ्यांमध्ये सुमारे ४ लाख महिला आहेत.
आयुष्मान वय वंदना कार्ड सुरू केल्यानंतर ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या ४,८०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना ९ कोटी रुपयांच्या उपचारांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १,४०० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. या उपचारांमध्ये अँजिओप्लास्टी, नितंब फॅक्चर/प्रत्यारोपण, पित्ताशय काढणे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रोस्टेट पुनर्रचना आणि स्ट्रोक यांसारख्या विविध आजारांचा समावेश आहे.