विरार : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अगदी काही तास बाकी असताना विरारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी आणलेले 5 कोटी रुपये असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी हॉटेलमध्ये धडकत विनोद तावडे यांना घेराव घातला. यानंतर विरारमध्ये प्रचंड मोठे राजकीय नाट्य बघायला मिळाले. विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटप करण्यासाठी आल्याची माहिती दस्तूरखुद्द भाजपमधूनच देण्यात आली. असा गौप्यस्फोट हितेंद्र ठाकुर यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
विरार पूर्वेतील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यांनी त्यांना जवळपास चार तास घेराव घातला होता. अखेरीस विनोद तावडे, क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला. तर ठाकुर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आवाहन तावडे यांनी केले आहे. तर राजन नाईक यांच्यासह दोघे हे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असल्याने त्यांना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्यास मज्जाव केला.
भाजपामधूनच तावडेंविरोधात दिली गेली टीप..
यावेळी हितेंद्र ठाकुर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनोद तावडे हे पैसे वाटप करण्यासाठी पाच कोटी रुपये घेऊन विवांतामध्ये आल्याची टीप भाजपामधूनच आल्याचा गौप्यस्फोट ठाकुर यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपामधील एका मित्राने ही माहिती दिल्याचे ठाकुर यांनी सांगितले. यावरून आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. तर, हे प्रकरण इथेच थांबवण्याची विनंती तावडेंनी केल्याची माहितीही हितेंद्र ठाकुर यांनी दिली. या प्रकारानंतर तावडे यांनी चौकशी करण्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तावडेंचा गेम करण्याचा प्रयत्न?
विनोद तावडे हे बहुजन नेतृत्व असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांचा भाजपमधून गेम करण्यात आल्याचा आणि त्यांचे नेतृत्व संपविण्याचा डाव आखल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता या सर्व प्रकारावर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधण्यात येत आहे.
विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची..
विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे बघायला मिळाले. या घटनेमुळे विनोद तावडे तीन तासांपेक्षा जास्त वेळ हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही त्यांना हॉटेलमधून जाऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनाही मारहाम केली. बविआच्या कार्यकर्त्यांनी राजन नाईक यांचे देखील कपडे फाडले.