पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रलोभन, टास्कफ्रॉड, अमली पदार्थ, मनीलॉन्ड्रिंगचा धाक दाखवून सायबर चोरट्यांचे फसवणुकीचे सत्र वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत नागरिकांची ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १५ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत ज्येष्ठ नागरिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर तीन महिन्यांपूर्वी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिप दाखविण्यात आले होते. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास
सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पुरी तपास करत आहेत.
वारजे भागातील एकाची शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १७ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बडाख तपास करत आहेत. पाषाण भागातील एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून खात्यातून ऑनलाइन पद्धतीने दहा लाख रुपये चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.
ज्येष्ठ महिलेने चतुः शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदननगर भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी १९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. तरुणाने याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.