लोणी काळभोर : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे 100 टक्के वाटप केल्याचा निवडणूक आयोगाने दावा केला आहे. मात्र निवडणूक निर्णय आयोगाने केलेला हा दावा लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत फोल ठरल्याचा प्रकार मंगळवारी (ता.१९) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या दोन्ही गावातील अनेक नागरिकांना मतदार माहिती चिठ्ठ्या न मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर आमच्या चिठ्ठ्या गेल्या कुठे? अथवा खाल्ल्या कोणी ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना निवडणुकीच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार माहिती चिठ्ठ्या देण्याचे आदेश दिले होते. मतदार केंद्रावर कोणतीही गैरसोय होऊ नाही. यासाठी आदेश ज्या त्या गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासननियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तर नागरिकांना मतदान करताना सोयीस्कर व्हावे. यासाठी घरोघरी जाऊन मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी देण्याची जबाबदारी बीएलओवर सोपविण्यात आली होती. मात्र उद्या बुधवारी (ता.२०) निवडणूक प्रक्रीयेचे मतदान होणार असतानादेखील बहुसंख्य नागरिकांना आज मंगळवार (ता.१९) पर्यंत मतदार माहिती चिठ्ठी देण्यात आलेली नाही. यामुळे आयोगाने दिलेले काम कितपर्यंत झाले? हे दिसून येत आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांमध्ये ४० हजारहून अधिक मतदान आहेत. लोणी काळभोर गाव, सिद्राम मळा व परिसरात तर कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन, घोरपडे वस्ती, समता नगर, राजग्रह कॉलोनी, कवडीपाट येथील अनेक नागरिकांना मतदार माहिती चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे मतदानाला जाताना नागरिकांचा प्रचंड गोंधळ होणार असून मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याचा परिणाम पूर्ण मतदान प्रक्रियेवर होऊन मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते.
दरम्यान, बीएलओने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीत मतदार माहिती चिठ्ठी वाटप केल्याचा कागदोपत्री मोठा आकडा दाखविला असला. तरी प्रत्यक्षात अनेक नागरिकांना मतदार माहिती चिठ्ठी मिळालेली नाहीत. या सारखी परिस्थिती शिरूर हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्येही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बीएलओने नेमके काम तरी काय केले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तर कामात काटकसर करणाऱ्यांवर आयोगाकडून काय कारवाई होणार? याकडेही सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शिरूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की शिरूर हवेली मतदार संघात मतदार माहिती चिठ्ठी 100 टक्के वाटण्यात आलेली आहे. मात्र त्यांना सांगितले की, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अनेक नागरिकांना मतदानाच्या चिठ्ठ्या मिळाल्या नाहीत. तेव्हा म्हस्के यांनी सांगितले तुम्हाला एक अधिकारी फोन करेल? तुम्ही त्यांच्याशी बोला. त्यानंतर अधिकारी सदाशिव सावंत यांचा फोन आला. त्यावेळी त्यांना 25 मतदारांची नावासहित माहिती देण्यात आली. ते म्हणाले मला सर्व मतदारांनी सांगावे. म्हणजे मी त्या बीएलओ वरती कारवाई करतो. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
लोकसभेला मतदानाचा प्रथम अधिकार बजावला होता. त्यावेळीही चिठ्ठी आलेली नव्हती. आणि आता विधानसभेच्या वेळेसही अद्यापपर्यंत चिठ्ठी आलेली नाही. त्यामुळे मतदान कोठे करायचे ते समजत नाही. त्यामुळे नाव शोधण्यासाठी खूप त्रास होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य पाळल्या तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. व सर्व मतदारांचा वेळ वाचणार आहे. बीएलओने ठराविक, प्रत्यष्ठीत व ओळखीच्या नागरिकांना मतदानाच्या चिठ्ठ्या दिल्याचे समजत आहे.
सुनीत जैनजांगडे (मतदार – लोणी काळभोर)