पुणे : कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत पतीने ३५ वर्षीय पत्नीवर धारदार ब्लेडने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना वडगाव परिसरात घडली आहे. या घटनेत रेखा संतोष चौधरी (वय-३५, रा. वडगाव, पुणे) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पती सतीश संतोष चौधरी (वय-३७) याच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव परिसरात एका इमारतीत महिला एकटीच पतीपासून विभक्त होऊन राहत होती. तिचा पती सतीश चौधरी याने बाहेरुन दारु पिऊन येत तिला तू येथून कोठेही जायचे नाही, पत्ता बदलयाचा नाही, मी रुम पाहतो तिकडे आपण जाऊन एकत्र राहू, असे म्हणत तिच्या जवळ आला. त्यामुळे महिलेने त्याला विरोध केला.
त्यामुळे आरोपीने चिडुन जाऊन तिला वाईट शिवीगाळ करुन त्याचे शर्टच्या खिशातील ब्लेडने तिच्या उजवे कानाचे खालील बाजुस, मानेजवळ हनुवटीवर, डावे हाताचे अंगठ्यावर, डावे हाताचे मनगटाजवळ ब्लेडने वार केले. या घटने महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर आरोपी पती त्या ठिकाणाहून पळून गेला. आरोपीचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांनी दिली आहे.