पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या आहेत. त्यानंतर उमेदवारांकडून जाहीर प्रचार बंद करण्यात आला. प्रचाराची मुदत संपल्यानंतर छुपा प्रचार करण्यात येतो. मात्र, पुण्यात उघडपणेच छुपा प्रचार सुरू असल्याचा प्रकार दिसून आला आहे. काही उमेदवारांकडून सांकेतिक शब्दांचा वापर करत निवडणूक प्रचार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
निवडणूक आचारसंहितेनुसार, प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणत्याही स्वरुपात प्रचार करण्यावर बंदी असते. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार करता येत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमात असलेली पळवाट शोधण्यात काही उमेदवार मात्र यशस्वी झाल्याचे दिसून आले आहेत. उमेदवार-पक्षांनी थेट होर्डिंग झळकवले आहेत.
पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून टॅगलाईनचा वापर करत फ्लेक्स, होर्डिंगच्या माध्यमातून प्रचार सुरूच आहे. प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार करत असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल, सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती.
मात्र, आज पुणे शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील अनेक ठिकाणी लागलेल्या या फ्लेक्सवर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.