मुंबई : विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. संतप्त झालेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे.
विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली.
ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत.
काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. यावेळी क्षितीज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे.