पुणे : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सातत्याने वाढत आहे. शहरातील अपघातांची मालिका सुरुच आहे. अशातच आता पुन्हा अल्पवयीन मुलाने स्कॉर्पियो कारने तीन वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून त्यात दोन जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला आहे.
अमोद कांबळे (वय 27, रा. भोसरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, दोन दुचाकीचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पवयीन आरोपी मुलाचे वय 17 वर्षे 10 महिने आहे. मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय 32, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा मुळचा आसामचा असून तो दिघीतील लष्करी तंत्रज्ञान संस्थेत अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याचे वडील लष्करात जवान असून आसाम सीमारेषेवर कार्यरत आहेत. अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्राच्या मोटारीमधून भोसरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने येत होता. त्याने दारू प्राशन केली होती. त्याच्यासमवेत त्याचा एक मित्रही मोटारीत होता. अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. मुलाने मद्यपान केल्यानंतर मित्राची एसयुव्ही कार भोसरीवरुन नाशिका फाटापर्यंत भरधाव वेगाने चालवित होता. त्यानंतर त्या गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यादरम्यान, त्या अल्पवयीन मुलाने तीन वाहनांना धडक दिली आणि एक डिव्हाडरला ठोकली.
या अपघातात ऑटोरिक्षा, एक स्कूटर आणि एक मोटारसायकल यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125 (ए), 125 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अल्पवयीन मुलाला बालन्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची बालसुधारगृहात रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार पंकज महाजन करीत आहेत.