पुणे : मराठी प्रेक्षकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. मुकुंद यांनी ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना आपल्या आवाजाने वेड लावलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट गाणी गायली आहेत. अशा या गायकाने या जगाचा निरोप घेतला आहे. लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. गेले काही दिवस ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल होते. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मुकुंद फणसळकर यांना मराठी प्रेक्षकांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
एकेक शब्द असा गायचा की…: सलील कुलकर्णी
सलील यांनी पोस्ट करत लिहिलं, ‘मुकुंद फणसळकर गेला. अतिशय आवडता गायक. एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा… आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने.. बोलण्याने भारावून टाकलं होतं… त्यातलं एक महत्त्वाचं नाव…. खूप खूप वाईट वाटलं.. प्रीतरंग, साजणवेळा, नॉस्टॅस्जिया. सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या. एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली. मुकुंद यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या निधनाने चाहत्यांनाही धक्का बसलाय.
मुकुंद फणसळकर यांनीमराठी सिनेसृष्टीसाठी उत्कृष्ट गाणी गायली. झी मराठीवरील ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातून ते घरोघरी पोहोचले. त्यापूर्वी त्यांचा दूरदर्शनवर एक ‘स्मरणयात्रा’ नावाचा कार्यक्रम खूप गाजला होता. यासोबतच ते झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या कार्यक्रमाचे पहिले विजेते ठरले होते.