पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अगदी काही तास बाकी असताना मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. अशातच बारामतीमध्ये सोमवारी रात्री मोठी घडामोड बघायला मिळाली.
सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे. अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूममध्ये रात्री पोलिसांनी सर्च ॲापरेशन राबवलं आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये नेमकं काय सापडलं, कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आलाी आहे, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. राज्यासह देशाचे लक्ष बारामतीमधील लढतीकडे लागले आहे. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आपण कुटुंबात एकटे पडलो असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती. अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय वगळता पवार कुटुंबातील इतर सगळेजण शरद पवारांसोबत असल्याचे दिसत आहे. श्रीनिवास पवार यांनी सुद्धा अजित पवार यांना विरोध दर्शवला आहे.
नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी म्हटले की, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शो रुम ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी आपल्याकडे पोलिसांचे एक पथक आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिली. आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांना काहीच सापडलं नाही. शरद पवारांनी संबोधित केलेल्या सांगता सभेला आलेली गर्दी पाहून काहीजण बिथरले असावेत. असं युगेंद्र पवारांनी सांगितले.
बारामती येथील शरयू टोयोटा या शोरूमवर रात्री सर्च ऑपरेशन करण्यात आले या संदर्भात बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्यानुसार आम्ही या ठिकाणचे सर्च ऑपरेशन केले. या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम मिळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.