मुंबई : बाबा सिद्दीकी प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोई याला सोमवारी (दि.18) कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेतले आहे. अनमोल हा कुख्यात गॅंगस्टर लॉंरेन्स बिष्णोई याचा भाऊ आहे. अमेरिकन यंत्रणांनी भारतीय यंत्रणांना याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अनमोल बिश्नोई फरार होताच त्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलीसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिका-यांनी अनमोल बिश्नोई अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात असल्याचे सांगितले. मुंबई पोलीसांनी धडक कारवाई करत लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला लवकरच भारतात आणले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अनमोल बिश्नोई हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी खून प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोईविरुद्ध नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर 18 अन्य गुन्हेही नोंदवले आहेत. नुकतेच एनआयएने अनमोलला अटक करण्यात मदत करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.