पालघर : मतदानाला काही तास बाकी असताना राज्यात राजकारण तापले आहे. पालघरमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक आमनेसआमने आले असून पैसे वाटपावरून पालघरमध्ये जोरदार राडा झाला. हे प्रकरण आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलं. पोलिसांनी एक गाडी ताब्यात घेतली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पालघरमध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात जोरदार राडा झाला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. पालघरमधील विष्णूनगर भागात वर्धमान संकुलातील घटना घडली.
शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. परिसरात जोरदार गोंधळ झाल्याचं समजताच पोलीस घटनास्थळी धाव घेत त्यांनी वातावरण शांत केलं आहे. तसेच पोलिसांकडून एक कार ताब्यात घेण्यात आली आहे.
शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप..
पालघर शहरातील विष्णू नगर परिसरामध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या कार्यक्रमांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. प्रचार संपल्यानंतर देखील शिंदे गटाचे नगरसेवक सोसायटीमध्ये जाऊन प्रचार आणि पैसे वाटप करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान काही काळ या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक बंड्या म्हात्रे आणि अमोल पाटील हे रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास पालघरच्या विष्णुनगर परिसरातील वर्धमान सोसायटीमध्ये प्रचारासाठी गेले होते. प्रचार करत असताना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर काही वेळातच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तिथे जमा झाले. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली .
पोलिसांकडून मध्यस्थी..
ही घटना घडल्यानंतर तात्काळ पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर ठिकाणी एक कार पोलिसांना दिसून आली. त्या कारची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. कारची तपासणी केल्यानंतर त्या कारमध्ये पैसे अथवा इतर वस्तू सापडले नसल्याने या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करून दोन्ही गटाला समज दिली आहे. अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत.