पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. उद्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज बारामतीमध्ये शरद पवार पोहोचले होते. त्यादरम्यान, हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.
सध्या राज्यभर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दौरे करत आहेत. त्यांचे विशेष लक्ष्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य नेत्यांच्या मतदारसंघाकडे आहे. विधानसभेला शरद पवार यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. शरद पवार आपल्या होमग्राऊंडवर युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये आले आहेत. त्यावेळी शरद पवार हेलिपॅडवर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगा आणि साहित्याची निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या बॅगेत कपडे, पाण्याची बॉटल, वर्तमानपत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे त्या बॅगेत सापडले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा बॅग तपासण्याचा व्हिडिओ काढला होता . त्यानंतर ठाकरेंचीच बॅग का चेक केली जात आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून ते नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांच्या बॅग तपासण्याचे व्हिडिओ जारी केले होते. आता शरद पवार यांची बॅगही तपासली गेली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारादरम्यान ‘व्हीआयपी’ राजकीय नेत्यांच्या झाडाझडतीने सर्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत. या विधानसभेला बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे.