मणिपूर : इंफाल, मणिपूरमधील हिंसक चकमकी होऊन एक वर्षाहून अधिक काळ होऊन गेला आहे. तरी देशाच्या पूर्वेकडील राज्यातील परिस्थिती अद्याप शांत झालेली नाही. येथे हिंसाचाराच्या घटना वारंवार होत आहेत. अशातच ६ जणांच्या अपहरणानंतर त्यांचे मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसक संघर्षांना त्रासदायक असल्याचे म्हटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याचा दौरा करून प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
आंदोलकांनी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या खाजगी निवासस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हिंसाचारग्रस्त राज्यात सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये आणखी एक मोठा संघर्षांचा भडका बघायला मिळाला. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या सुनेसह काही आमदारांच्या घरांचीही तोडफोड करण्यात आली असून त्यांची मालमत्ता जाळली आहे. इम्फाळच्या विविध भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला.
नेमकं प्रकरण काय?
नदीजवळ सापडलेल्या सहा मृतदेहांमध्ये आठ महिन्यांच्या अर्भकाचाही समावेश आहे. वास्तविक, मेईतेई समुदायाचे हे सर्व लोक सोमवारी निर्वासित छावणीतून बेपत्ता झाले होते. जिरीबाममधील बोकोबेरा येथून कुकी-जो अतिरेक्यांनी कथितपणे त्यांचे अपहरण केले होते, जेव्हा सीआरपीएफची कुकी तरुणांच्या दुसऱ्या गटाशी चकमक सुरू होती. या चकमकीत ११ संशयित अतिरेकी मारले गेले आहेत.
माघार घेत असताना, अतिरेक्यांनी पोलीस ठाण्याजवळील मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केल्याची माहिती आहे. सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी मणिपूर-आसाम सीमेवरील जिरीबाम जिल्ह्यातील जिरीमुख या दुर्गम गावात नदीजवळ त्यांचे मृतदेह सापडून आले. शुक्रवारी रात्री हे मृतदेह आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले.
जिरीबाममध्ये ६ जणांचे मृतदेह सापडल्याच्या विरोधात खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये निदर्शने करण्यात आली आहेत. ईशान्येकडील राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यात २ दिवस इंटरनेट बंद करण्यात आले आहे. इम्फाळ खोऱ्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. कारण, जमावाने अनेक आमदारांच्या घरांवर हल्ला केला आणि मालमत्तेचे नुकसान केले.