मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अशातच या नाकाबंदीदरम्यान मानखुर्द पोलिसांनी शनिवारी वाशी चेकनाका परिसरात चेन्नईहून येणारा एक संशयित ट्रक अडवला. या ट्रकच्या तपासणीत आठ हजार 476 किलो वजनाची चांदी सापडली आहे. त्याची किंमत 80 कोटी रुपये असल्याचं तपास यंत्रणेचं म्हणणं आहे.
या प्रकरणाची अधिक चौकशी प्राप्तिकर विभाग आणि निवडणूक आयोगाचे पथक करत आहे. सबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द पोलिसांनी शनिवारी वाशी चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली होती. तेथून जाणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या वाहनाची झडती घेतली जात होती. तेवढ्यात एक ट्रक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवला. पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली. ट्रकमागील फाटक उघडल्यावर पोलिसांना संपूर्ण ट्रक चांदीनं भरलेला दिसून आला. या चांदीचे वजन केले असता एकूण वजन 8,476 किलो असल्याचं आढळून आले. चांदीचा बाजारभाव अंदाजे 79 कोटी 78 लाख 21 हजार 972 रुपये असल्याचे पोलिसांचं म्हणणे आहे.
आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जात आहे. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.