पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात आहे. मतदानाला अगदी काही दिवस बाकी आहेत. अशात विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या माजी आमदाराला मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराचा अश्लील व्हिडीओ सद्या व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार आणि माजी आमदार शरद सोनवणे यांचा हा अश्लील व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला आहे. अश्लील आणि चारित्र्यहनन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका इंस्टाग्राम पेजवरून शरद सोनवणे यांचे अश्लील व्हिडिओ नारायणगाव आणि जुन्नर परिसरातल्या काही व्हाट्स अॅप ग्रुपवर मतदारसंघात व्हायरल झाले आहेत.
या प्रकरणानंतर जुन्नरचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जुन्नर तालुक्यातील शरद शरद सोनवणे समर्थक महिलांनी तातडीने यावर आळेफाटा पोलीस स्टेशनवर रात्री उशिरा मोर्चा काढला. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांसह सूत्रधारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी सुद्धा सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान शिवजन्मभूमी सारख्या राज्याला आदर्श देणाऱ्या तालुक्यात असा प्रकार सुरू झाल्याने मोठ्या संतप्त, नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.
जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार आमने-सामने..
दरम्यान जुन्नरमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांच्या विरोधात निवडणूकीच्या मैदानात उभे आहेत. तर प्रमुख 5 उमेदवारांची पंचरंगी लढत या तालुक्यात होत आहे. यंदाची जुन्नरची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.