बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु आहे. अनेक नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. अशातच “सर्वांगीण विकासासाठी आगामी निवडणुकीमध्ये महायुतीच्याच सर्व उमेदवारांना निवडून देत राज्यात युतीची सत्ता आणायची आहे. बारामतीकरांनीही लोकसभेला जशी आमची गंमत केली, तशी करू नये,” अशी साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना घातली आहे. अजित पवार यांनी शनिवारी बारामती तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. त्यात बोलत असताना त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
अजित पवार म्हणाले की, “या निवडणुकीत जर मतदारांनी आमची गंमत केली, तर तुमचीही जंमतच होईल.” गंमत केल्यास त्याची मोठी किंमत बारामतीकरांना चुकवावी लागेल. साहेबांनी (शरद पवार) दीड वर्षानंतर निवडणूक लढविणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे त्यानंतर कोण हे सगळ बघणार, याचा विचार तुम्ही करायला हवा. काम करण्याची धमक आमच्यात आहे. असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, “बारामतीत इतक्या निवडणुका झाल्या, मीही खासदार आमदार झालो, पण त्या वेळेसही प्रतिभाकाकी (प्रतिभा पवार) कधीच प्रचाराला आल्या नव्हत्या. पण या निवडणुकीला त्यांना काय नातवाचा पुळका आलाय, काही समजेना,” असं बोलून अजित पवार यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.