पिंपरी : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बडे बडे नेते प्रचार सभा गाजवत आहेत. दावे-प्रतिदावे करत आहेत. अशातच मतांच्या लाचारीसाठी महाविकास आघाडीने २०१२ ते २०२४ या कालावधीत जेवढे दंगे झाले आहेत, त्या दंग्यांमधील मुस्लीम समाजातील आरोपींवरील गुन्हे माफ करण्याची मौलांनाची मागणी मान्य केली आहे. मतांच्या लांगुनचालनासाठी तळवे चाटत आहेत. ध्रुवीकरण केले जात आहे. त्यामुळे एक राहून मतांचे धर्मयुध्द करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. आमदार अमित गोरखे, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना (शिंदे) उपनेते इरफान सय्यद यावेळी उपस्थित होते.
….मुस्लीम महिलांनाही लाभ दिला : देवेंद्र फडणवीस
सरकारने लाडकी बहिण योजनेचा मुस्लीम महिलांनाही लाभ दिला. सर्व योजनांमध्ये सर्व समाजाला सामावून घेतले आहे. असे असताना महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जागलो नाही तर पुन्हा झोपून रहावे लागेल. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन करून फडणवीस म्हणाले, लाडकी बहिण योजना यशस्वी होणार नाही, असे विरोधक म्हणत होते. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे टाकले. या योजनेविरोधात आघाडीचे लाेक न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना चपराक दिली. महायुतीचे पुन्हा सरकार आल्यास महिलांना दरमहा २१०० रूपये देण्यात येतील. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा चेहरा-मोहरा बदलला..
पुणे, पिंपरी-चिंचवड शहराचा २०१४ नंतर चेहरा-मोहरा बदलला आहे. मेट्रो, उड्डाणपुल, पायाभूत सुविधा वेगाने तयार केल्या जात आहे. त्यामुळे उद्योग पुण्यात येत आहेत. हे उद्योगांकडून वसुली करणारे नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. माक्रोसॉफ्टने इंडियाने हिंजवडीत मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळून ५० हजारहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
कुत्तें भुकें हजार, हत्ती चले बाजार..
कुत्तें भुकें हजार, हत्ती चले बाजार, असे म्हटले जाते. भोसरीत विकासकामे २०१४ नंतर झाली आहेत. शास्तीकर, उपयोगकर्ता शुल्क माफ केले. आंद्रा, भामा-आसखेड धरणातून शहरासाठी पाणी आणण्यात आले. त्यामुळे कोणी कितीही भुंकले तरीही आपली कामे झाकली जाणार नाही. कठीणातले कठीण प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे शहरातला रेडझोन प्रश्न तसेच ब्लू लाईन, रेड लाईनचाही प्रश्न सोडवू, असे आश्वासन फडणवीस यांनी प्रचार सभेला संबोधित करताना दिले.