पुणे : राज्याच्या किमान आणि कमाल तापमान घट होत असून मागील चार दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पण आता राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आजपासून ढगाळ वातावरण कमी होऊन स्वच्छ आकाशाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दीर्घतरंगीय किरणोत्सर्ग अधिक प्रमाणात होईल. यामुळे स्वाभाविकच रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणाऱ्या किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होत जाणारा आहे. आज (ता. १७) राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात होणार आहे. शनिवारी धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात शनिवारी १३.६ अंश तापमानाची नोंद झाली होती. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे किमान तापमान १५ अंशांवर होते. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ उतार पाहायाला मिळाला.
राज्यात आजपासून ढगाळ वातावरण नाहीसे होण्यास सुरुवात होईल. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असून नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यभरात थंडी पसरेल.