रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी स्वीकारल्यानंतर रुग्णांची सेवा करत असताना रुग्णसेवेचे गांभीर्य ओळखून कर्मचारी नरेश जोशी यांनी क्षणाचाही विलंब हा न करता स्वतः रक्तदान करत एका गरोदर महिलेचा जीव वाचवला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात एक महिला दाखल झाली होती. उपचारादरम्यान त्यांना ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. जिल्हा रुग्णालयासह रेडक्रॉस या खासगी रक्तपेढीतही या गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. त्यानंतर या रुग्णालयासह नातेवाईकांनी ओ निगेटिव्ह रक्त असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तालुक्याच्या बाहेरून आल्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांची रत्नागिरी शहरात फारशी ओळख नव्हती.
त्यामुळे महिलेसाठी रक्त आणायचे कुठून? या विवंचनेत कुटुंबीय सापडले होते. जिल्हा रुग्णालयात अपघात विभागात कायम हसतमुख चेहऱ्याने काम करणारे कर्मचारी नरेश जोशी यांना या घटनेची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. नरेश जोशी यांचाही रक्त गट ओ निगेटिव्ह असल्याने त्यांनी तत्काळ कुटुंबीयांचा शोध घेत आपण रक्तदान करण्यास तयार असल्याचे सांगितले. रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान करून प्रक्रियेनंतर ते तत्काळ महिलेस उपलब्ध करून देण्यात येणार होते. त्यामुळे नरेश जोशी यांनी तत्काळ रक्तदान केले. त्यामुळे त्या महिलेला रक्त उपलब्ध झाले. जिल्हा रुग्णालयात सेवा करत असताना स्वतः रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवणाऱ्या नरेश जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.