पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. तिच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये देखील उकळले. दरम्यान, तरुणीने दिलेले पैसे परत मागितले असता, त्याने तिला शिवीगाळ करून हाताने जबर मारहाण केली. तसेच स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडित ३१ वर्षीय तरुणीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नृत्याचे क्लास घेते, तर आरोपी हा खासगी कंपनीत नोकरी करतो. एका ठिकाणी भेटल्यानंतर दोघांचा परिचय झाला होता. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. पुढे तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिच्याकडून आरोपीने वेळोवेळी तीन लाख २५ हजार रुपये घेतले.
तरुणीने पैसे परत मागितले असता आरोपीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. तरुणीची चारचाकी गाडी देखील आरोपीने त्याच्या ताब्यात ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.