पुणे : सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीच्या एमबीएच्या बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट तयार करून त्याची सेवापुस्तिकेत नोंद करायला दिली. या प्रकरणाला तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याच्या आरोपांवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे व इतर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुधीर रामचंद्र आल्हाट (वय-५४, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालय येथे १ जानेवारी २००८ ते जानेवारी २०१६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे २००८ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे रेक्टर होते. त्या वेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमधून २००८ व २००९ या शैक्षणिक वर्षांमध्ये एमबीएची बनावट डिग्री प्राप्त करून त्यांच्या स्वतःच्या सेवापुस्तिगोप्त नोंद करून घेतली. त्याला तेत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे यांनी संगनमताने साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी आल्हाट यांनी या सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. २७ डिसेंबर २०१६ रोजी सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीने सोमनाथ बनकर या नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.