इंदापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत. अनेक नेते एकमेंकावर आगपाखड करताना पाहायला मिळत आहे. अशातच इंदापूर विधानसभा मतदार संघातील अजित पवारांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी श्रीनिवास पवार सामील झाले होते. यावेळी सभेतून बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांना सगळेच त्याच्या हाताखालचे लागत असतात. त्याला धमकी द्यायची सवय आहे, पण त्याच्या धमकीला घाबरू नका, असे आवाहन श्रीनिवास पवारांनी इंदापूरांना केले आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघात अजित पवारांनी दत्तात्रय भरणे तर शरद पवारांनी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिली आहे. हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे कट्टर विरोधक आहेत. याच कट्टर विरोधकाच्या प्रचारात शुक्रवारी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांवर आगपाखड केली.
श्रीनिवास पवार म्हणाले, अजित पवारांनी साहेबांना सोडले ते मला आवडलं नाही. तसेच सुप्रियाला पाडण्यासाठी तू प्रयत्न करतोय हे मला पटल नाही, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. तसेच मी राजकारणात कधी येणार नाही तर साहेबांना साथ द्यायला येणार असल्याचे सुद्धा श्रीनिवास पवार म्हटले.
श्रीनिवास पवार हे पुढे बारामतीच्या विकासावर बोलत असताना त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, खरंच बारामतीचा विकास लोकांनी नीट पहिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी बारामतीत एस्टी स्टँड आहे, पण एसटी चांगल्या नाहीत, असे म्हणत अजितदादांच्या बारामतीच्या विकासाच्या मुद्यावर प्र्श्न उपस्थित केला. तसेच दादाला सगळे त्याच्या हाताखालची लागतात. त्याला धमकी द्यायची सवय आहे त्याला तुम्ही घाबरू नका, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले आहे.
84 वयाच्या योद्ध्याला साथ द्यायची आहे..
जनतेने आता निर्णय घेतला आहे, 84 वयाच्या योद्ध्याला साथ द्यायची. यावेळी सरकार बदलून दाखवायचं. त्यानंतर साहेब दिल्लीला जातील आणि दिल्लीत सुद्धा गडबड करतील. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी आहे, त्याला दणका दिल्याशिवाय ते राहणार नाहीत, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे. तसेच दादा सांगायचे साहेबांचा नाद नका करू आणि दादांनीच साहेबांचा नाद केला.पण, आता जो बाण सुटलाय तो परत येणार नाही. परत एक होणे नाही, असे म्हणत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावली.
…महिन्यानंतर दादांवर तीच वेळ आली
अजितदादांनी रोहित दादाची नक्कल केली. पाच महिन्यानंतर दादांवर तीच वेळ आली. आणि दादाची नक्कल साहेबांनी केली. वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुप्रियाची नक्कल केली आपल्या छोट्या बहिणीचे नक्कल केली. आता दादा फोन करतायेत कसा आहेस तू, बरा आहेस का तू, येऊन भेट. कुठल्याही माणसाला कमी समजू नका, असा इशारा सुद्धा श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना दिला.