पुणे : राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आला आहे. अनेक नेते प्रचार सभा घेत आहेत, बैठक पार पडत आहेत. अशातच कसबा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची पुणे येथे सभा झाली असून त्यांनी विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर तोफ डागली. ‘‘ॲक्सिडेंटल पीएम’प्रमाणे कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर ॲक्सिडेंटल आमदार आहे. या आमदाराचे काम कमी आणि दंगाच जास्त आहे. त्यांना रंगभूमीवर नेले तर ‘तो मी नव्हेच’ पेक्षाही चांगली भूमिका ते वठवतील. त्यांच्या कामांबाबात मी सांगायला नको,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीप्रमाणे उलेमा यांचे पाय चाटणे सुरू केले. त्यांनी १७ अटी टाकल्या असून, अल्पसंख्याक समुदायाचे लांगुलचालन करण्याचे काम आघाडी करीत आहे. त्यांच्या या अटी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीही मान्य केल्या आहेत, असे सांगून फडणवीस यांनी चलचित्रफीत दाखवून राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर केंद्रातील सत्ता घालविण्याचा उलेमांचा हेतू असल्याचा आरोप केला आहे.
व्होट जिहादचा प्रयत्न पुन्हा सुरू..
ते पुढे म्हणाले, ‘व्होट जिहादचा प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी ते करीत आहेत. मात्र, बंदी घालणे त्यांना शक्य नाही. ‘व्होट जिहाद’ ते करीत असतील, तर आपल्याला मताचे जिहाद सुरू करायचे असून, मतांच्या धर्मयुद्धाने त्याला उत्तर द्यायचे आहे. पुढील पिढीच्या अस्तित्वासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. कसबा नाव घेतल्यावर दिवंगत नेते गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांची आठवण येते. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून पुण्यात गतीने विकास झाला आहे.
कसबामध्ये भूमिगत मेट्रो तयार झाली असून, मेट्रोचे शहरात विस्तारीकरण झाले. आधी बसव्यवस्था योग्य नव्हती. पण, पीएमपीच्या ताफ्यात वातानुकूलित दीड हजार इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘एआय’च्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोडला चालना दिली. प्रत्येक रस्त्यावर दुमजली रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ५४ हजार कोटी रुपये दिले आहेत. नदी प्रकल्प सुशोभीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहे. शहरासाठी आणखी एक विमानतळ देण्यात येणार आहे. पुण्यात नवीन एसआरए नियमावली करण्यात आली. जुने वाडे पुनर्विकासात करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.