पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुटी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. सुटी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरंपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामासाठी मतदारसंघांच्या बाहेर असतील, तरी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.