छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मळणीयंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांवर आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतामध्ये मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करीत होत्या. मका मशीनमध्ये टाकत असताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये जाऊन अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठी दुर्घटना घडली.
केस मशीनमध्ये अडकल्याने त्या वेगाने मशीनकडे ओढल्या गेल्या आणि त्यांच शीर धडावेगळ झालं. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मजुर महिलांना मोठा झटका बसला आहे.तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
कोकिलाबाई या अत्यंत गरीब होत्या. कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे अवघी दीड एकर शेती आहे. शेतीत भागत नसल्याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. त्यामुळे कोकिळाबेन यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.