ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेबाबत अनेक चर्चा कानावर येत आहेत. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत एक बातमी माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा भारतात आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आता ‘हायब्रिड मॉडेलवर’ खेळवली जाणार असल्याची शक्यता आहे. यावेळी दक्षिण अफ्रिका किंवा दुबईत टीम इंडियाचे सामने आयोजित केले जाऊ शकतात. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद भारताला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानने जर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतली तर अशा परिस्थितीत संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाण्याचौ शक्यता आहे. अलीकडे, दक्षिण आफ्रिकेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद दिले जाऊ शकते असं सांगण्यात येत होते. परंतु, एका अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेचा पर्याय आता संपला आहे, कारण SA20 लीग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काही दिवस आधी संपणार आहे. त्यामुळे खेळपट्ट्या लगेच तयार करणे शक्य असणार नाही. याच अहवालात असाही दावा करण्यात आला होता की, जर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली किंवा हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला तर त्याचे यजमानपद भारताकडे सोपवले जाऊ शकते.
या सर्व प्रकरणी बीसीसीआयशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकही सामना किंवा मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही गेल्या 29 वर्षांतील पहिली आयसीसी स्पर्धा आहे जी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये 1996 आयसीसीची शेवटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत हे संघ होणार सहभागी..
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. या कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेमध्ये झाले होते. यावेळी सुद्धा असच काही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यजमान असल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला असून पाकिस्तानसह यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे.