मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘आम्ही हे करु’ या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात चार प्रमुख भाग आहे. यापैकी पहिल्या भागात मुलभूत गरजा आणि जीवनमान, दुसऱ्या भागात दळवळण, तिसऱ्या भागात औद्योगिक धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हे जनतेचे प्रश्न असल्याने ते सोडवण्यासाठी आम्ही काम करु, असे राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, अनेक पक्षाचे जाहीरनामे आले, अनेक पक्षांनी आपल्या योजना त्या जाहीरनाम्यात दिल्या आहेत. आमच्या 17 नोव्हेंबरच्या सभेला अजून प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कमी वेळेत तयारी करणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही ही सभा न घेण्याचं ठरवलं आहे. त्या दिवशी मुंबई, ठाण्यात मी सभा घेणार आहे, असंही राज ठाकरे यांनी जाहीर केलं. अनेकांनी आपल्या जाहीरनाम्यात काय करु ते दिलंय. पण आमच्या जाहीरनाम्यात काय करु आणि कसं करु ते याचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे…
-मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
-दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
-गडकिल्ले संवर्धन
-कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
-डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
-घनकचरा व्यवस्थापन
-सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
-राज्याची औद्योगिक प्रगती
-मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार