मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेक नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार हा मोठा मिसफायर झाला. तसेच अनेक जागा आम्ही कमी मतांनी हरलो असे सुद्धा अजित पवार म्हणाले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला होता. सत्ता स्थापन करण्यासाठी 275 जागांची गरज होती. मग यांना ४०० सीटची गरज संविधान बदलण्यासाठी, हिंदू राष्ट्र आणण्यासाठीच यांना एवढ्या जागांची गरज आहे, असा फेक नरेटिव्ह विरोधकांकडून पसरवण्यात आला. संविधान बदलणार नाही, आम्ही हे आम्ही वारंवार सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पार हा मोठा मिसफायर झाला.
बटेंगे तो कंटेगा या नाऱ्याला माझा विरोध..
अजित पवार म्हणाले की, बटेंगे तो कंटेगा या नाऱ्याला तर माझा विरोध आहे. या घोषणेला भाजपमधून देखील विरोध झाला आहे. प्रत्येक राज्याचे राजकारण हे वेगवेगळ असते. उत्तरप्रदेशमध्ये हे चालत असेल पण महाराष्ट्रात हे चालणार नाही. मी ऐकलं की पंकजा मुंडेंनी देखील विरोध केला आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
मला किंगमेकर होण्यात रस नाही..
अजित पवार पुढे म्हणाले, मला किंगमेकर होण्यात रस नाही. आम्हाला योजना योग्य पद्धतीने राबवायच्या आहेत, त्यासाठी महायुतीचे सरकार आले पाहिजे .२ कोटी ३० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. लाडक्या बहिणींना पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये दिले आहेत. काँग्रेसने आतापर्यंत सव्वा रुपये दक्षिणापण दिली नाही. लाडक्या बहिणींना पण माहित आहे काँग्रेस त्यांना काही देणार नाही.