पुणे : राज्यात एकीकडे थंडीची चाहूल लागली असताननाच दुसरीकडे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवाळीनंतर महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागली आहे. पण आता तापमानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात थंडी, तर काही ठिकाणी ऊन आणि पावसाच्या सरी… असं चित्र आहे. अशावेळी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थंडीची चाहुल लागल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. समुद्रावरून आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येऊन ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारपासून पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
राज्यात अनेक भागातील तापमान 18 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी पडली आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणाचा पारा 11 अंशापर्यंत घसरल्याचं निदर्शनास आलं आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे, पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.