सासवड : सासवड नगरी आणि पुरंदर तालुक्याचं भूषण असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते थ्री डी रंगावलीकार सोमनाथ भोंगळे यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर रांगोळी काढल्याने बच्चन यांनी त्यांना शाबासकी दिली. यामुळे सर्वत्र सोमनाथ भोंगळे याचं कौतुक होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने (11 ऑक्टोबर) सोमनाथच्या थ्रीडी रंगावली प्रदर्शनांची आणि कार्याची नोंद घेत सोमनाथला अमिताभ यांच्या ‘जनक’ बंगल्यात बोलावून घेत त्यांना रांगोळी काढण्यास सांगितले.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांना भोंगळे यांनी काढलेली रांगोळी एवढी आवडली की, दिवाळी पर्यंत ही रांगोळी अशीच ठेवण्याचे आणि रांगोळीची काळजी घेण्याचे सेवकांना सांगितले. यावेळी अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी सोमनाथच्या कलाकृतीचं भरभरून कौतुक केलं आणि त्याच्या कलेला मनापासून दाद दिली.
कोण आहे सोमनाथ भोंगळे?
सोमनाथ भोंगळे यांच्या थ्री डी रंगावली कलाकृती गेल्या अनेक वर्षांपासून प्रदर्शनांतून रसीक जाणकार आणि सामान्य जनतेच्या पसंतीस उतरल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आणि गावागावांत त्यांची एकल आणि समुहाची थ्री डी रंगावली प्रदर्शने वेगवेगळ्या औचित्यानं भरत असतात. मुळ पींड चित्रकलेचा असल्यानं त्यांनी पोस्टर कलर, ॲक्रीलिक कलर तसेच तैलरंगांतून असंख्य व्यावसायिक कामे केली आहेत.
पुणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या भिंती सोमनाथच्या कल्पक थ्री डी चित्रांनी बोलक्या केल्या आहेत. त्यांच्या प्रमाणबद्ध आणि सुबक सुंदर चित्रांनी प्राथमिक शिक्षण अधिक गमतीदार आणि सुंदर होत आहेत. भारतीयांच्या मनात मोलाचं स्थान मिळविलेला अभिनेता अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग अफाट आहे.
मात्र, सोमनाथच्या जीवनात अमिताभ बच्चन यांचं स्थान आई वडीलांनंतरच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लहानपनापासूनच प्रचंड चाहता असणाऱ्या सोमनाथनं अमिताभचा वाढदिवस त्यांच्या विविध छबी रंगावलीतून साकारून अनेक वर्षांपासून साजरा केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सोमनाथच्या आधीच सोशल मीडिया द्वारे त्याच्या अनेक रांगोळ्या पोहचल्या होत्या. मागील वर्षी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेट वर सोमनाथने अमिताभ बच्चन यांचे जंजीर मधील ऑईल कलर मधील पेंटिंग तसेच त्यांचे वडिल हरिवंश राय बच्चन यांचे ऑईल कलर मधील पेंटिंग वाढदिवसानिमित्त भेट दिले होते. तेंव्हा अमिताभ बच्चन यांचे डोळे भरून आले होते. या वेळी सोमनाथ यांनी पुढील वर्षी मला तुमच्या वाढदिवसानिमित्त बंगल्यावर प्रत्यक्ष भेटून ही रांगोळी कला दाखवणं माझं स्वप्न आहे, अशी इच्छा बोलून दाखविली होती. आता ती इच्छा सोमनाथची पूर्ण झाली आहे.