पुणे : पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघांत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी महत्वाची माहिती मतदारांना दिली आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर नागरिकांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
दरम्यान, छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे, अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे. या नागरिकांकडे नाही अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.
‘या’ १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत न्या
आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायविंहा लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्यामुळे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.