नवी दिल्ली: गत पाच वर्षांमध्ये बौद्धिक संपदा अधिकारांसाठी पेटंट नोंदविण्यात भारताची वेगवान वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. २०१८ ते २०२३ दरम्यान भारताकडून पेटंट आणि औद्योगिक डिझाईन नोंदविण्याची संख्या दुप्पट झाल्याने भारताने जगात सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) ताज्या वार्षिक अहवालानुसार भारतातून मोठ्या प्रमाणात पेटंट दाखल होत आहेत. तीन मुख्य बौद्धिक संपदा (आयपी) अधिकारांसाठी जगातील टॉप १० देशांमध्ये प्रथमच भारताचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पेटंट, औद्योगिक डिझाईन, अॅप्लिकेशन आणि ट्रेडमार्क अॅप्लिकेशन या तीन गोष्टी समाविष्ट आहेत. भारतात पेटंट दाखल करण्याचा दर सलग पाचव्या वर्षात दुहेरी अंकात नोंदविण्यात आला.
२०२३ साली जगभरात ३५ लाखहुन अधिक पेटंट दाखल करण्यात आले. गतवर्षी सर्वाधिक १६ लाख ४० हजार पेटंट चीनमधून दाखल करण्यात आले. यापाठोपाठ अमेरिकेतून ५१८३६४, दक्षिण कोरियातून २८७९५४, जर्मनीतून १३३०५३ दाखल झाले. तर सहाव्या स्थानी असलेल्या भारतातून ६४,४८० पेटंट दाखल करण्यात आले. पेटंट दाखल करण्याचा भारताचा दर २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १५.७ टक्के राहिला. तर पेटंटच्या बाबतीत आशियाचा दबदबा कायम आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे बौद्धिक संपदा अधिकाराद्वारे शोधकर्त्याच्या आविष्कारांचे कायदेशीर संरक्षण केले जाते. या अधिकारांमध्ये पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक डिझाईन, भौगोलिक संकेत व व्यापार रहस्य यांसारख्या बाबींचा समावेश आहे. त्यामुळे नवसंशोधन, साहित्य, कलात्मक कार्य, डिझाईन, प्रतीक, चिन्ह, नाव आणि वाणिज्य क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या प्रतिमांसाठी पेटंट, ट्रेडमार्क व कॉपीराईट दाखल केले जातात. तर १९६७ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या संस्थेच्या स्वरूपात स्थापन झालेल्या डब्ल्यूआयपीओकडून जगभरात बौद्धिक संपदा अधिकारांच्या संरक्षणाला चालना देण्याचे काम केले जाते. यूएनच्या १५ विशेष संस्थांपैकी ही एक संस्था आहे