पुणे: पुणे आणि परिसरात थंडी वाढत असून, मंगळवारी (दि. १२) एनडीएचा पारा १३.३ अंश सेल्सिअस नोंदविला आहे. तर शिवाजीनगर येथे १५ अंश सेल्सिअस तापमान होते. दरम्यान, आगामी काही दिवस शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, सकाळी धुके पडण्याची, तसेच हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आकाश निरभ्र असल्यामुळे, तसेच उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यामुळे शहरातील किमान तापमानात घट झाली
आहे.
तसेच रात्रीपासून पहाटेपर्यंत धुकेही पाहायला मिळत आहे. सायंकाळनंतर गारठा जाणवू लागला आहे. थंडी वाढत असल्यामुळे नागरिकांचा ओढा स्वेटर, जर्किन खरेदीकडे वाढला आहे, कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. शहरात दुपारी उन्हाचा चटका कायम असला तरी तो कमी झाला आहे. मंगळवारी कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस होते. येत्या १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान, आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे.