पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अजय शिरसाठ (वय-४८, रा. धनकवडी), किरण किसन कानकर (वय-३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), गणेश कदम (वय-३५, रा. पद्मावती), दीपक दोडे (वय-५५, रा. बिबवेवाडी), दादासाहेब जोगदंड (वय-३५,रा. पद्मावती), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड), अर्जुन थोरात (वय-४९, रा. धनकवडी), बबन कांबळे (वय-५२, रा. बिबवेवाडी), उत्तरेश्वर साठे (वय-५५, रा. आंबेगाव), चंद्रकांत बाड (वय-३५, रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव करत आहेत.