-योगेश मारणे
न्हावरे : शिरुरच्या शेजारच्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि राज्याचे मंत्री हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी एका उद्योगपतीच्या मार्फत शरद पवार यांनी पक्षात घ्यावे. तशी सेटिंगही लावली होती. मात्र, शरद पवारांनी गद्दारांना पक्षात पुन्हा संधी दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे त्या मंत्र्याचा ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश नाकारला गेला. असा गौप्यस्फोट मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत नाव न घेता शिरूर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी केला.
शरद पवार हे सर्वाधिक लोकप्रियता मिळालेले राज्यातील एकमेव नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर गद्दारी केली. तर मेल्यावरही गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही. या भावनेमुळेच मी शरद पवार यांच्या सोबत राहिलो आहे. असे महाविकास आघाडीने शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले. न्हावरे (ता.शिरूर) येथे मंगळवारी रात्री (दि.12) प्रचारादरम्यान झालेल्या सभेत आमदार पवार बोलत होते.
पुढे आमदार पवार म्हणाले की, माझे वडील माजी आमदार कै. रावसाहेबदादा पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्याशी एकनिष्ठ राहून कायम सोबत राहिले. त्याच पद्धतीने मी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळेच मी शरद पवार यांची साथ सोडली नाही. तसेच माझ्या समोर आयात उमेदवार असून, त्या पक्षाची ओळख आयात उमेदवारांचा पक्ष अशीच आहे. असेही आमदार पवार यावेळी म्हणाले.
यावेळी माजी जि. प. सदस्य वसंतराव कोरेकर, प्रा.डॉ. गोविंदराजे निंबाळकर, भानुदास सात्रस, सागरराजे निंबाळकर, शंकर फराटे, महादेव जाधव, प्रकाश बहिरट, गोरख तांबे, मानसिंग कोरेकर, संदीप यादव, भाऊसाहेब भोंडवे, बाळासाहेब खंडागळे, दादासाहेब मारणे, गोपाळ हिंगे, राजेंद्र भोंडवे, बिरा शेंडगे, तात्याबा शेंडगे, शरद पवार, मारुती मारणे, कैलास पवार, रमेश जाधव, नागेश निंबाळकर, नानासाहेब कोरेकर, गोरक्ष मारणे, भिमाजी पाटोळे इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.