मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहे. काही गौप्यस्फोट सुद्धा होताना दिसत आहेत. अशातच अजित पवार यांनी एका मुलाखती दरम्यान गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार एका मुलाखतीत बोलत होते. भाजप राष्ट्रवादीचं सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका पार पडल्या होत्या. यातील एक बैठक उद्योगपतीच्या घरी पार पाडली होती. या एका बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल असे सगळे उपस्थित होते,असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केली आहे. तसेच या बैठकीत उद्योगपती देखील सामील होता.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्या गोष्टी आता काढून काही उपयोग नाही. त्या गोष्टीचा सर्व दोष माझ्यावर आला. त्या गोष्टीची सर्व जबाबदारी मी उचलली आणि सर्व नेत्यांना वाचवलं, असे देखील त्यांनी सांगितलं. तसेच मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आलं की, शरद पवार जर बैठकीत होते, मग भाजपसोबत गेले का नाही? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अजित पवार म्हणाले की, शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे कुणीच ओळखू शकत नाही. प्रतिभा काकी देखील त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
पवार कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर यावर अजित पवार म्हणाले, मी त्याबद्दल अद्याप विचार केला नाही आहे. माझं सध्या लक्ष्य निवडणुकीवर आहे. आणि महायुती विधानसभेच्या 175 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला. तसेच अजित पवार पुढे म्हणाले मला विचारधारेबद्दल विचारू नका. महाराष्ट्राचं राजकारण बदललंय. प्रत्येकालाच सत्ता हवी आहे, त्यामुळे त्यांनी विचारधारा बाजूला ठेवली आहे. आणि सत्ता स्थापण करून सरकार चालवायचं आहे,असे अजित पवारांनी सांगितले.